गोव्याचा विषय निघाल्यानंतर अनेकांच्या डोक्यात सर्वात पहिल्यांदा पार्टी आणि दारुचा विचार येतो. गोव्याचं नाव काढल्यानंतर अनेकदा बहुतेकजण दारुशी संबंध जोडतात. त्यात काही चुकीच नाहीय. पण तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यापेक्षा जास्त मद्यपान तेलंगणमध्ये केले जाते.

महत्त्वाच म्हणजे दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्यपान केलं जातं. तंबाखू सेवनाच्या यादीत ईशान्य भारतातील राज्ये सर्वात आघाडीवर आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० मधून ही माहिती समोर आली आहे. गुजरात आणि जम्मू-काश्मीर या राज्यात पुरुष कमी प्रमाणात दारु पितात. गुजरातमध्येही दारुबंदी आहे. २०१५-१६ मध्ये १५ ते ४९ वर्षामधील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नव्या सर्वेक्षणातही १५ वर्षावरील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महिलांच्या मद्यपानामध्ये सिक्कीम आणि आसाम ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. सिक्कीममध्ये १६.२ टक्के तर आसाममध्ये ७.३ टक्के महिला मद्यपान करतात. महिलांच्या मद्यपानामध्येही तेलंगणने गोव्याला मागे टाकले आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पुरुषांच्या मद्यपानामध्ये फरक आहे. पण महिलांइतके हे अंतर मोठे नाहीय. सर्वच राज्यांमध्ये दारुपेक्षा तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे. तंबाखू सेवनामुळे कॅन्सर होतो, याबद्दल अनेकदा माहिती दिली आहे. पण तरीही देशात तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे.