चार वर्षे विजनवासात राहिल्यानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ उद्या पाकिस्तानात परत येत आहेत. मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकात सहभागी होण्याची त्यांची इच्छा आहे. दरम्यान, तालिबानने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली असून यापूर्वीही तीनदा त्यांच्या खुनाचा प्रयत्न झालेला आहे.
मुशर्रफ हे दुबईहून कराचीला येत असून त्यांचे समर्थक यावेळी जंगी स्वागत करणार आहेत. पाकिस्तानातील तीन न्यायालयांनी त्यांना अकबर बुगटी व बेनझीर भुत्तो हत्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणांमध्ये त्यांना फरारी घोषित करण्यात आले होते. त्यांच्या ‘ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग’ या पक्षाने आज पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्या असून सकाळी अकरा वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होत आहे. कायदे आझम यांच्या समाधीस्थळाजवळ त्यांची जाहीर सभाही होणार आहे. विजनवासात असताना मुशर्रफ हे नेहमी दुबई-लंडन अशा चकरा मारत असत. त्यांनी पाकिस्तानात जाऊ नये असा सल्ला सौदी अधिकाऱ्यांनी दिला असतानाही ते आता पाकिस्तानात परत येत आहेत. २००९ मध्ये मुशर्रफ हे विजनवासात गेले व नंतर अनेकदा त्यांनी मायदेशी परतण्याचा मनोदय जाहीर केला होता. मुशर्रफ यांनी ‘वख्त’ या टीव्ही चॅनेलला सांगितले की, आपल्याविरोधात जे खटले आहेत त्यांना सामोरे जाण्यात आपण घाबरत नाही, त्यातील अनेक खटले हे घटनाबाह्य़ आहेत. प्रदीर्घ लढा देण्यास आपण तयार आहोत पण आपण मायदेशी परतण्याची वेळ आता आली आहे. पाकिस्तानातील राजकारणात आपण भूमिका पार पाडू, सुरक्षा हा माझ्यासाठी प्रश्न नाही, सरकारकडे आपण सुरक्षा मागितलेली नाही. मायदेशी येताना आपली स्वत:ची सुरक्षा असेल. आगामी निवडणुका ११ मे रोजी होत असून त्यात आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. या निवडणुका पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या आहेत व निवडणूक निकालांनी अनेक पक्षांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सूचित केले.