सध्याच महाग असलेले पेट्रोल डिझेलचे भाव येत्या काळात आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. मध्य पूर्वेतील तणावाच्या स्थितीमुळे कच्च्या तेलाचे भाव ८० डॉलर्स प्रति बॅरल इतके म्हणजे आत्तापेक्षा ३० टक्क्यांनी वाढू शकतात, असा इशारा नोमुरा या जगप्रसिद्ध आर्थिक विश्लेषक कंपनीने दिला आहे. तसे झाले तर त्याचा थेट परिणाम भारतावर होईल आणि नवीन वर्षात भारतातील पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडू शकतात.

आज मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर ७७.५३ रुपये आहे तर डिझेलचा भाव प्रति लिटर ६२.७५ रुपये आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरांचे सरकारी नियंत्रण काढून आता ते आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर जसे कमी जास्त होतील, त्याप्रमाणे रोजच्या रोज पेट्रोल डिझेलचे भाव बदलले जातात. जर, नोमुरानं व्यक्त केलेली भीती खरी झाली आणि आणि कच्च्या खनिज तेलाचे भाव ३० टक्क्यांनी वधारले तर भारतामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०० रुपयांच्या घरात जाईल अशी साधार भीती आहे. अर्थात, २०१९ सालच्या लोकसभेच्या व २०१८ मधल्या आठ राज्यांच्या निवडणुका लक्षात घेता, केंद्र सरकार हस्तक्षेप करून पेट्रोल डिझेलचे भाव वाढू देणार नाही अशीही अपेक्षा आहे.

मध्य पूर्वेमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू असून युद्धसदृष परिस्थिती आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी आंतराराष्ट्रीय बाजारात दिसण्याची शक्यता आहे. सध्या येमेनमध्ये अशांतता असून तब्बल ६०,००० जणांनी एकतर प्राण गमावले आहेत किंवा गंभीर जखमी झाले आहेत. तसेच साथीच्या रोगांनीही उच्छाद मांडला आहे. दरम्यान, कतारला सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्त या देशांनी कोंडीत पकडले आहे.

या तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारातील तेलाच्या भावांवर होण्याची शक्यता आहे. परिणामी जगभरात महागाईदेखील वाढेल अशी भीती नोमुराने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. जर कच्च्या तेलाचे भाव ३० टक्क्यांनी वाढले तर या एकाच गोष्टीमुळे बहुतेक सगळ्या देशांमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल.

तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया व ब्राझिलसारख्या देशांना होईल. तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका व टर्कीसारख्या देशांना मात्र याची झळ बसणार आहे. येमेनमधल्या हौथी बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे, आणि तसे झाले तर सौदी अऱेबिया इराणच्या विरोधात उभे ठाकेल. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.