पेट्रोलचे प्रति लिटर दर नव्वदी पार करणार का? तर डिझेलचे दर प्रतिलिटर ८० ते ८५ रुपयांचा आकडा गाठणार का? असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून या दरांमध्ये कपात बघायला मिळते आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २२ पैशांनी तर डिझेलचे दर २१ पैशांनी कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर हा ८४ रुपये ६ पैसे असेल तर डिझेलचा दर ७६ रुपये ६७ पैसे असेल.

मुंबईत असे दर असतानाच दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे. पेट्रोल दर २२ पैसे प्रति लिटर कमी झाल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर ७८ रुपये ५६ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर २० पैशांची कपात झाल्याने दिल्लीत एक लिटर डिझेलसाठी ७३ रुपये १६ पैसे मोजावे लागणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती घटल्याने भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात होताना दिसते आहे.