23 November 2017

News Flash

महागाईत पेट्रोल!

मुंबई : " ७९.४८  दरवाढीचा तीन वर्षांतील उच्चांक

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: September 14, 2017 2:13 AM

मुंबई : ” ७९.४८  दरवाढीचा तीन वर्षांतील उच्चांक; ग्राहकांत तीव्र असंतोष

पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत चाललेल्या दराने बुधवारी गेल्या तीन वर्षांत प्रथमच उच्चांक गाठला. मुंबईत बुधवारी पेट्रोलचे दर लिटरला ७९ रुपये ४८ पैशांवर गेले. याआधी १ ऑगस्ट २०१४ रोजी पेट्रोलचे दर ८१ रुपये १५ पैसे होते. नवीन धोरणानुसार सध्या पेट्रोलचे भाव रोजच्या रोज बदलले जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत तुलनेने कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे भाव मात्र त्या प्रमाणात कमी झालेले नसल्याने नागरिकांमध्ये  तीव्र संतापाची भावना आहे. मात्र पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी आताची दरवाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीस अनुसरूनच असल्याचे म्हटले असून, इंधनतेल दरनिश्चितीच्या सध्याच्या धोरणात बदल करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

जुलैपासून पेट्रोल व डिझेलचे दर ७ रुपये तीस पैसे वाढले आहेत. या दरवाढीविरोधात समाजमाध्यमांतून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. यूपीए सरकारच्या काळातील पेट्रोल दरवाढीविरोधात भाजपने केलेली आंदोलने, नरेंद्र मोदी, स्मृती इराणी यांसारख्या भाजपनेत्यांच्या तेव्हाच्या ट्विपण्या, तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळातील भाजपच्या ‘जनता माफ नही करेगी’ ही जाहिरात यांची आठवण आता समाजमाध्यमांतून करून दिली जात असून, ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली जात आहे. पेट्रोलियम उत्पादने ही वस्तू व सेवा करातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राज्यांच्या करानुसार त्यांचे दर ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढत असले तरी राज्यांच्या कराचा फार मोठा बोजा पेट्रोल व डिझेलवर असतो, त्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना बसतो. परिणामी, यातील काही कर थोडे कमी करण्याची मागणी पुढे येत आहे.

पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी, आताचीच दर प्रणाली कायम राहील असे सांगतानाच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार दर सतत बदलल्याने वितरक व ग्राहकांना लाभ पोहोचवता येतो असा दावा केला होता. जेव्हा नवीन पद्धत सुरू केली तेव्हा पहिल्या पंधरवडय़ात भाव कमी झाले होते. नंतर जागतिक किमतीनुसार ते वाढले. एकदम अडीच-तीन रुपये वाढ करण्यापेक्षा रोजच्या रोज ती आंतरराष्ट्रीय दरानुसार कमीजास्त झाली तर दिलासा मिळू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. याआधी दर पंधरा दिवसांना पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असत.

दरवाढ का?

खनिज तेलाच्या किमती पिंपाला ५३.६३ डॉलर असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे. तेलाच्या किमती गेल्या आठवडय़ात डॉलरपेक्षा अधिक वाढल्या आहेत. ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेच्या देशांक डून पुरवठा होणाऱ्या तेलाचा दर शुक्रवारी बॅरलला ५२.५३ डॉलर्स होता, त्यामुळे ५० डॉलर्सचा धोकादायक उंबरठाही ओलांडला गेला आहे. ओपेक व इतर दहा देशांत तेल उत्पादन कपातीचा करार झाला होता. त्यानुसार सौदी अरेबिया व इराक यांनी तेल उत्पादन कमी करण्याचे ठरवले आहे. त्याचा परिणाम दरवाढीत झाला आहे.

तेल कंपन्यांच्या कारभारात आम्ही कार्यक्षमतेच्या मुद्दय़ाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप करणार नाही.   – धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियममंत्री

First Published on September 14, 2017 2:13 am

Web Title: petrol price hike