पेट्रोलचे प्रति लिटर दर मुंबईत १६ पैशांनी तर दिल्लीत १८ पैशांनी कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. अशात डिझेलचे दर जैसे थे ठेवत पेट्रोल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे.
३१ ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही घट किंवा वाढ बघायला मिळाली नाही. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८४ रुपये ८६ पैसे असा असेल. तर डिझेलचा दर जैसे थे म्हणजेच ७७ रुपये ३२ पैसे इतका असेल. दिल्ली पेट्रोल १८ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीत प्रति लिटर पेट्रोलचा दर ७९ रुपये ३७ पैसे असेल. तर डिझेलच्या दरांमध्ये कोणताही फरक न पडल्याने डिझेलचा दर प्रति लिटर ७३ रुपये ७८ पैसे इतका असेल.

पेट्रोलच्या दरांनी नव्वदी गाठली होती, तर डिझेलचे दर ८० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दर काही प्रमाणात का होईना पण कमी होताना दिसत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली असताना हा काही अंशी का होईना दिलासा मिळताना दिसतो आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.