पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जप्त केलेल्या गोपनीय दस्तऐवजांमध्ये, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सादर करणार असलेल्या अर्थसंकल्पातील राष्ट्रीय गॅस ग्रीडबद्दलची माहिती असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूह, एस्सार आदी कंपन्यांमधील अधिकाऱ्यांनाही दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. शैलेश सक्सेना (रिलायन्स इंडस्ट्रीज लि.), विनयकुमार (एस्सार), सुभाषचंद्र (ज्युबिलियण्ट एनर्जी), ऋषी आनंद (रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी लि.) आदी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आणखी नऊ जणांना अटक केली आहे.
     विशिष्ट उद्योग समूहांचा फायदा व्हावा म्हणून हे सर्वजण अत्यंत संवेदनाक्षम अशी माहिती त्यांना पुरवित असल्याची माहिती दिल्ली गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी न्यायालयास शुक्रवारी दिली. याखेरीज, पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचे पत्रही ताब्यात घेतले आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाशी संबंधित माहितीचा दस्तऐवज आरोपी राकेश याच्याकडून मिळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरी केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण नऊजणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघे पेट्रोलियम मंत्रालयातील कनिष्ठ कर्मचारी आहेत. या सर्व आरोपींकडे कोळसा व ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित संवेदनशील दस्तावेज सापडले असून हे दस्तावेज संबंधित आरोपी काही बडय़ा कंपन्यांना देणार होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रयास जैन व शंतनु सैकिया यांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे चोरीची कागदपत्रे सापडली आहेत. सैकिया हे माजी पत्रकार असून वेब पोर्टल चालवतात. संवेदनाक्षम माहिती पुरवून या इसमांनी ज्या कंपन्यांचा फायदा करून दिला, त्या कंपन्यांची चौकशी करण्याची गरज आहे, असे पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांना सांगितले.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तेल मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांना व रिलायन्स उद्योग समूहाच्या एका कर्मचाऱ्यास व इतर दोन मध्यस्थांना सरकारची वर्गीकृत कागदपत्रे कंपन्यांना देऊन पैसे घेतल्याच्या प्रकरणी अटक केली होती.
असा रचला सापळा
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले की, दोन व्यक्ती व त्यांचे साथीदार यात सामील असल्याची माहिती मिळाली होती व ते पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयातील कार्यालयात १७ फेब्रुवारीला मध्यरात्री गेले होते.  तीनजण इंडिगो मोटारीतून शास्त्रीभवनजवळ आले होते, त्यातील दोनजण आतमध्ये गेले. तिसरा मोटारीजवळ बसून होता. दोन तासांनी दोघे आले व मोटारीत बसले त्यानंतर तिघांनाही पकडण्यात आले.