पुढील महिन्यापासून जेव्हा तुम्ही नोकरी बदलाल तेव्हा तुमचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) थेट हस्तांतरित होणार आहे. मुख्य भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही.पी.जॉय यांनीच याची माहिती दिली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे (इपीएफओ) कामकाज कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने अनुकूल बनवण्याच्या दिशेने पाऊले उचलले जात आहे. मधूनच खाते बंद होणे हेच आमच्यासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगत आमच्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

जॉय म्हणाले, जेव्हा एखादा कर्मचारी आपली नोकरी बदलतो. तेव्हा त्याचे खाते बंद होते. त्यानंतर तो कर्मचारी पुन्हा नव्याने खाते उघडतो. आता आम्ही खाते उघडण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. खाते बंद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. पीएफ खाते हे एक स्थायी खाते आहे. कर्मचारी सामाजिक सुरक्षेसाठी एकच खाते कायम ठेवता येईल.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर कोणत्याही अर्जाविना त्याचे पैसे तीन दिवसांत हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. भविष्यात जर कोणाकडे आधार कार्ड किंवा योग्य ओळखपत्र असेल तर देशातील कोणत्याही ठिकाणी नोकरी बदलली तरी अर्ज न करता खाते हस्तांतरित केले जाईल. ही व्यवस्था लवकरच लागू होईल, असे जॉय यांनी सांगितले.

इपीएफओने आपल्या विस्ताराचा वेगही वाढवला आहे. जानेवारी ते जून दरम्यान चालवलेल्या अभियानात एक कोटींहून अधिक कामगारांची नोंद झाली आहे. आता आम्ही सेवा सुधारून त्यांना कायम ठेवू इच्छितो.

पीएफचा पैसा घर, मुलांचे शिक्षण किंवा गंभीर आजारावरील इलाजासाठी काढला पाहिजे. तेव्हाच लोकांना खरी सामाजिक सुरक्षा मिळेल. आवश्यक गरजांसाठीच हा पैसा काढला जावा यासाठी आम्ही लोकांच्या जागृतीसाठी एक अभियान सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.