अमेरिकेतील फायझर कंपनीला जर्मनीच्या बायोएनटेक कंपनीने तयार करून दिलेल्या कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल हाती आले असून ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आले. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे.

फायझर कंपनी व बायोएनटेक यांनी सांगितले की, त्यांच्या एमआरएनए लशीच्या (शास्त्रीय नाव बीएनटी १६२ बी २) तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पार पडल्या असून या लशीने सर्व घटकात परिपूर्णता दाखवली आहे. ही लस तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वामध्ये परिणामकारक ठरली.

या आठवडय़ात मॉडर्ना कंपनीने त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल जाहीर केले होते, त्यात ती लस ९४.५ टक्के म्हणजे अदमासे ९५ टक्के प्रभावी ठरली होती. यापूर्वीच्या

चाचण्यांत फायझर व बायोएनटेकची लस ९० टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते. दुसरा डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये दिसलेले परिणाम फायझरच्या तिसऱ्या टप्प्यात विचारात घेण्यात आले. फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते, असे सूत्रांनी सांगितले.

नवे काय?

जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत.  २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे.

इतर लशींचे प्रभावप्रमाण..

गेल्याच आठवडय़ात रशियाने आपली स्फूटनिक लस करोनापासून बचावासाठी ९२ टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मॉडर्नाची लस ९४.५ टक्के (९५ टक्के) प्रभावी ठरल्याचे निकाल आले होते. पण ती वयस्कर व्यक्तींमध्ये कितपत प्रभावी आहे हे अनुत्तरित राहिले होते. आता फायझरची लस जास्त व्यापक परिणाम साधणारी असल्याचे स्पष्ट झाले.

जगात रोज हजारो लोकांना कोविड संसर्ग होत असून सुरक्षित व प्रभावी लस तातडीने शोधणे गरजेचे आहे. या लशीच्या आठ महिन्यांच्या प्रवासात हा महत्त्वाचा टप्पा असून आम्ही विज्ञानाच्या गतीने मार्गक्रमण करीत आहोत.

– डॉ. अल्बर्ट बोरला, फायझरचे अध्यक्ष