जम्मू-श्रीनगर हायवेवर गेल्या महिन्यात कारमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून यामधील एक दहशतवादी पीएचडी स्कॉलर आहे. सीआरपीएफचं पथक जात असताना एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. पुलवामा हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच हा हल्ला झाला होता. पोलिसांनी या स्फोटाचा छडा लावला असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी बनिहाल कार स्फोटाचा आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात अनेक जवानांनी आपले प्राण गमावले होते. ३१ मार्च रोजी बनिहाल येथे झालेला कार स्फोट जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांनी रचलेला कट होता अशी माहिती पोलीस महासंचालक एम के सिन्हा यांनी दिली आहे.

सीआरपीएफचा ताफा जात असताना जम्मू श्रीनगर हायवेवर जवाहर टनल येथे एका कारमध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. स्फोट होण्याआधी कारने ताफ्यातील अनेक वाहनांना ओव्हरटेक केलं होतं. हा स्फोट सुरक्षेतील मोठी त्रुटी होती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

‘आम्ही या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला असून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अपयशी झालेला हा कार हल्ला जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांनी आखला होता. पाकिस्तानी दहशतवादी मुन्ना बिहारी याने हल्ल्याची सूचना दिली होती’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिलाल अहमद याचाही समावेश असून तो पीएचडी स्कॉलर आहे. जमात-ए-इस्लामी संघटनेच्या विद्यार्थी विंगचा तो सक्रीय सदस्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये असणारी चिंता हा त्याच्या संशोधनाचा विषय होता. पंजाबमधील भटिंडा येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून त्याला अटक करण्यात आली.

‘अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना जमैत-उल-तलबा मध्ये भरती केलं जात असून नंतर त्यांना कट्टर प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना दहशतवादी कारवायांमध्येही सहभागी करुन घेतलं जातं,’ अशी माहिती सिन्हा यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या इतर पाचजणांची नावे वसीम किंवा डॉक्टर, उमर शफी, अकीब शाह, शाहीद वानी (पुलवामाचा वॉट्सन) आणि ओवैस अमीन आहेत.