सरन्यायाधीश गोगोई यांची खंत

नवी दिल्ली : न्यायपालिकेत ‘अनुचित’ कृत्यांच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याचा अनुभव येत असल्याचे खडे बोल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना सुनावले.

भारतातील न्यायालयांमध्ये लालित्यपूर्ण वक्तृत्व आणि चर्चा यांच्याऐवजी आता  कर्कश्यपणा आणि प्रेरित’ वर्तणूक वाढत चालल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

न्यायालयाचा शिष्टाचार आणि प्रतिष्ठा नाहीशी होऊ नये, यासाठी संबंधितांनी अशा घटकांना लवकर ओळखून आणि वेगळे काढून त्यांना दूर ठेवणे महत्त्वाचे आहे, असेही गोगोई म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

कायदामंत्री रविशंकर प्रसाद, अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ  यांसह ज्येष्ठ वकील आदी यावेळी उपस्थित होते. अनुचित कृत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे गेल्या काही काळापासून भारतीय न्यायपालिका पाहते आहे. अशा घटनांनी सर्वोच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांमध्ये त्यांचे कुरूप डोके वर काढले आहे. देशातील न्यायपालिकेचा शिष्टाचार, प्रतिष्ठा हरवू नये असा निश्चय सर्वानीच करायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.