फिलिपाईन्सचे राष्ट्रध्यक्ष रोड्रिगो दुत्तरत्ते यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना अपशब्द वापरल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. दुत्तरत्ते यांनी ओबामा यांच्या आईबाबत टिप्पणी करत ओबामांनी मानवाधिकारावर जगाला धडे देण्याची गरज नाही. तुम्हाला जगासमोर नम्र व्हावे लागेल. मी तुमचा निषेध करतो, अशा कठोर शब्दात सुनावले. दरम्यान, दुत्तरत्ते यांनी ओबामांची माफी मागितली आहे. पण बराक ओबामा यांनी मात्र त्यांच्याबरोबर होणारी बैठक रद्द केली आहे.
लाओसमध्ये मंगळवारी आसियान (दक्षिण पूर्व देशांची संघटना) संमेलनात ओबामा आणि दुत्तरत्ते हे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फिलीपाईन्समध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर सुरू असलेल्या कारवाईत आतापर्यंत २४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या कारवाईबाबत ओबामा आपल्याला जाब विचारतील अशी चिंता दुत्तरत्ते यांना आहे. या संमेलनात दुत्तरत्ते आणि ओबामा यांच्या द्विपक्षीय चर्चा होणार होती. परंतु दुत्तरत्ते यांच्या वक्तव्यामुळे बराक ओबामांनी ही बैठक रद्द केल्याचे समजते.
दुत्तरत्ते हे रंगेल व्यक्ती असल्याची टीका ओबामा यांनी केली. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दुत्तरत्ते यांच्याशी बैठकीची गरज नसल्याचे म्हटले आहे. दुत्तरत्ते हे याचवर्षी मे महिन्यात सत्तेवर आले आहेत. त्यांनी ड्रग माफियाचे समूळ उच्चाटन करण्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते.