विमानाच्या कॉकपीटमध्ये मुख्य वैमानिकाने महिला सह-वैमानिकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १ जानेवारी रोजी लंडन- मुंबई विमानात हा प्रकार घडला असून याप्रकरणी ‘जेट’ने चौकशी सुरु केली आहे.

जेट एअरवेजच्या लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात १ जानेवारी रोजी मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिकामध्ये टोकाचा वाद झाला. परिस्थिती इतकी चिघळली की मुख्य वैमानिकाने महिला सह-वैमानिकाला मारहाण केली. इराण- पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाताना ही घटना घडली. गैरसमजातून हा प्रकार घडला होता, केबिन क्रू सदस्यांनी हा वाद त्यावेळीच सोडवला, असे सूत्रांनी सांगितले. हा सर्व प्रकार सुरु होता त्यावेळी विमानात ३२४ प्रवासी आणि १४ केबिन क्रू सदस्य होते. मुंबईत विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले, अशी माहिती ‘जेट’मधील सूत्रांनी दिली.

संबंधित मुख्य वैमानिक गेल्या १० वर्षांपासून ‘जेट एअरवेज’मध्ये काम करत आहे. संबंधित महिला सह-वैमानिकाशी त्याचा यापूर्वीही वाद झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची माहिती नागरी ‘नागरी उड्डाण महासंचालनालया’ला (डीजीसीए) देण्यात आली असून या प्रकरणी ‘जेट’ने चौकशी सुरु केली आहे. मुख्य वैमानिकाने मारहाण केल्यानंतर महिला सह वैमानिक कॉकपीटमधून बाहेर आली होती. शेवटी मुख्य वैमानिकाने तिची मनधरणी केली आणि दोन्ही वैमानिक पुन्हा कॉकपीटमध्ये गेले. दोन्ही वैमानिकांनी प्रवासादरम्यानच कॉकपीटमधून बाहेर येणे, हा गंभीर प्रकार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.