News Flash

“करोनाविरोधी लढ्यात पंतप्रधान मोदी दिवसातील १८-१९ तास काम करतायत, करोनावरुन राजकारण करु नका”

"जे नेते नीट काम करत नाही त्यांना काम सादर करण्यासंदर्भातील..."

फाइल फोटो (सौजन्य: पीटीआय)

करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये केंद्र सरकार दिवसरात्र काम करत असल्याचं मत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकार करोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याने या विषयावरुन राजकारण केलं जाऊ नये, असंही गोयल यांनी म्हटल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरुन परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक प्रचार संपवून परतल्यानंतर मोदींनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेतल्याचा दावाही गोयल यांनी केलाय.

नक्की वाचा >> कुंभ असो वा रमजान, कुठेच करोनासंदर्भातील नियम पाळले गेले नाहीत; शाह यांनी व्यक्त केली नाराजी

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी करोना परिस्थितीवरुन भाष्य करताना भेदभाव होत असल्याचे आरोप केल्याचा संदर्भ गोयल यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिला. या विषयाला राजकीय रंग दिला जात असल्याचं पाहून मला फार वाईट वाटलं, असं गोयल यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. “करोना परिस्थितीवरुन राजकारण करु नये. केंद्र सरकार करोनाविरुद्ध लढाई कोणताही भेदभाव न करता लढत आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही लोकं या विषयाला राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून मला फार वाईट वाटतं,” असं गोयल यांनी म्हटलं आहे.

करोनाचा सर्वाधिक प्रदुर्भाव असणाऱ्या १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर केंद्राने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. सहा हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन हा करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये पुरवला जाणार असून सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

“राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८-१९ तास काम करतायत. बंगालमधील निवडणूक प्रचारानंतर दिल्लीत परतल्यावर त्यांनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मला (काल) रात्री एक वाजता कॉल करुन सर्व माहिती घेतली,” असंही गोयल म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना गोयल यांनी कोणाचंही नाव न घेता टोला लगावला, “जे नेते नीट काम करत नाही त्यांना काम सादर करण्यासंदर्भातील चिंता करावी लागतेय,” असं गोयल म्हणाले. रेल्वे मंत्री असणाऱ्या गोयल यांनी ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या दृष्टीतून ग्रीन कॉरिडोअर तयार केला जात असल्याचीही माहिती दिली. सोनिया गांधी यांनी शनिवारी भाजपा सरकारकडून काही राज्यांना झुकतं माप दिलं जात असल्याची टीका केली होती. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केंद्राला पत्र पाठवल्याचं सोनिया यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 8:57 am

Web Title: piyush goyal says centre working round the clock pm modi working 18 19 hours there should be no politics over covid 19 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोठा निर्णय! औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यावर केंद्र सरकारकडून बंदी
2 कुंभ असो वा रमजान, कुठेच करोनासंदर्भातील नियम पाळले गेले नाहीत; शाह यांनी व्यक्त केली नाराजी
3 लसीकरण गतिमान करण्याची गरज
Just Now!
X