केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अयशस्वी ठरली असून देशातील उपासमार होणाऱ्या गरिबांची संख्या वाढल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये उपासमार होणाऱ्यांची संख्या कशापद्धतीने वाढले आहे यासंदर्भातील आकडेवारी दर्शवणारी माहिती देण्यात आली आहे. तसेच या पुढेतरी केंद्र सरकारकडे गरिबांसाठी काही योजना आहे का असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

देशातील गरिबांना दोन वेळेच अन्न मिळावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०१६ साली पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु केली होती. मात्र ही योजना पूर्णपणे यशस्वी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. “केंद्र सरकारला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची उद्देश पुर्ण करण्यात अपयश आले आहे. उपासमार होणाऱ्यांची संख्या देशामध्ये वाढली आहे. यापुढे तरी भाजपा सरकारची यासंदर्भात काही योजना आहे का?,” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. या ट्विटबरोबर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये भारतामध्ये उपासमार होणाऱ्या लोकांची संख्या ही इथोपिया, केनिया, झांम्बिया, म्यानमार आणि इंडोनेशियासारख्या देशांमधील उपासमार झालेल्या लोकांहून अधिक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हातावर पोट असणाऱ्या गरीब वर्गाला याच योजनेच्या माध्यमातून एप्रिल, मे व जून असे तीन महिने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वाटप करण्याचे आदेश सर्व राज्यांना केंद्राने दिले आहेत. मात्र सध्या या योजनेंतर्गत फक्त तांदूळच देण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातून देण्यात आली. मात्र सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार ३९.३ कोटी लोकांना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये प्रत्येकी पाच किलो मोफत राशन वाटण्यात आलं आहे. केंद्र साशित प्रदेश आणि राज्यांमध्ये २४ एप्रिलपर्यंत ४० लाख टन अन्नधान्य पुरवण्यात आल्याचा दावा केंद्राने केला आहे.