राज्यसभेत नोटाबंदीच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांच्या कोपरखळ्यांनी एकच हशा पिकला. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही विश्वासात घेतले नाही. यात किती सत्य आहे हे माहिती नाही. पण जर जेटली यांना विश्वासात घेतले असते, तर त्यांनी माझ्या कानात नक्कीच त्याबाबत सांगितले असते, अशी कोपरखळी अग्रवाल यांनी मारली. त्यांच्या या कोपरखळीवर सभागृहात एकच हशा पिकला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही हसू आवरले नाही आणि ते जोरजोरात हसू लागले.

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदरोळ केला आहे. विरोधी पक्षांचे नेते या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. दररोज वेगवेगळे आरोप होत आहेत. गुरुवारीही राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल बोलू लागले. त्यांच्या कोपरखळ्यांनी राज्यसभेतील गंभीर वातावरण आपोआपच निवळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भावून होऊन माझ्या जीवाला धोका आहे, असे सांगतात तेव्हा मला खूपच दुःख होते. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बिनधास्तपणे फिरू शकता. कारण आमच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे, असे नरेश अग्रवाल म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात पुन्हा खसखस पिकली. भाषण करताना भावूक होण्याच्या मुद्द्यावर अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भावूक होणारे पंतप्रधान आपल्या देशाचे संरक्षण कसे करतील? आपल्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका असेल तर, ते पाकिस्तानपासून आपल्या देशाचे संरक्षण कसे करतील, असे प्रश्नही उपस्थित केले.

यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावरूनही त्यांनी सरकारवर तोफ डागली. नोटाबंदीचा निर्णय हा उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला आहे. अर्थमंत्र्यांनाही हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, हे बरोबर आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. काळा पैसा आणण्याच्या गोष्टी तुम्ही करता, पण आतापर्यंत परदेशातील काळा पैसा परत आणला का, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हरदोई येथील नरेश अग्रवाल समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. ते काही काळ बहुजन समाज पक्षातही होते. तेथून ते समाजवादी पक्षात आले. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवले आहे. १९९७ मध्ये अग्रवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आले. त्यावेळी त्यांनी कल्याण सिंह यांचे सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांमध्येच फूट पाडली होती.