देशात आज पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रॅकवरुन १.५ किमी लांबीच्या डबल स्टॅक मालगाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि ती राष्ट्राला अर्पण केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह राजस्थान आणि हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना मोदी म्हणाले, “देशाच्या पायाभूत सुविधांना आधुनिक बनवण्यासाठी सुरु असलेल्या महायज्ञाला आज गती मिळाली आहे. गेल्या दिवसांत आधुनिक डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. न्यू अटेली ते न्यू किशनगड पर्यंत १.५ किमी लांबीच्या मालगाडीची सुरुवात करण्यासह आज भारताने जगातील काही निवडक देशांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.”

आजचा दिवस एनसीआर, हरयाणा आणि राजस्थानचे शेतकरी, उद्योगपती, व्यापारी यांच्यासाठी नव्या संधी घेऊन आला आहे. डेडिकेटेड फ्रन्ट कॉरिडॉर हा ईस्टर्न किंवा वेस्टर्न असेल तो केवळ मालगाड्यांसाठी आधुनिक मार्ग नाही तर हा देशाच्या विकासाचा कॉरिडॉर आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

डीएफसी कॉरिडॉर कशाला म्हणतात?

डीएफसी कॉरिडॉर कुशल मालवाहतूक प्रणालीसाठी वापरला जातो. सध्या हरयाणा आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या पश्चिम डीएफसी आणि पंजाब आणि पश्चिम बंगालला जोडणारा पूर्व डीएफसी तयार होत आहे. आज पंतप्रधानांनी ज्या इलेक्ट्रिक ट्रॅकची सुरुवात केली त्याची एकूण लांबी सुमारे २,८४३ किमी आहे. उत्तर-दक्षिण (दिल्ली-तमिळनाडू), पूर्व-पश्चिम (पश्चिम बंगाल-महाराष्ट्र), पूर्व-दक्षिण (पश्चिम बंगाल-आंध्र प्रदेश) आणि दक्षिण-दक्षिण (तामिळनाडू-गोवा) डीएफसी प्रस्तावित आहे.

उद्योगांना कसा होणार फायदा?

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा न्यू रेवाडी-मदार खंड हरयाणा आणि राजस्थानमध्ये येतो. या संपूर्ण कॉरिडॉरमध्ये ९ नवी मालवाहक स्टेशन आहेत. यांपैकी तीन जंक्शन स्टेशन न्यू रेवाडी, न्यू अटेली आणि न्यू फुलेरा आहेत. रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरु झाल्यानंतर हरयाणाच्या रेवाडी, मानेसर, नारनौल, फुलेरा आणि राजस्थानच्या किशनगडच्या औद्योगिक वसाहतींना जास्त फायदा होईल.