ओडिशातील सभेत मोदींची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या गरिबी हटाव योजनेच्या घोषणेची खिल्ली उडवली. ही घोषणा चांगली असली तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी आश्वासने देऊन जो मार्ग अवलंबण्यात आला तो चुकीचा होता, अशी टीका पंतप्रधानांनी येथील सभेत केली.
केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित सभेत मोदींनी आपले सरकार संतुलित विकास साधेल, असे आश्वासन दिले. गरिबी हटाव घोषणा आम्ही साठ वर्षे ऐकत आहोत. उलट गरिबी व बेरोजगारी वाढल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपले सरकार श्रीमंतांसाठी नव्हे तर गरिबांसाठी काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असताना देखील पूर्वेकडील राज्ये अविकसित कशी राहिली, असा सवाल त्यांनी केला.भाजपशासित राज्ये इतर राज्यांपेक्षा वेगाने प्रगती करीत असल्याचा दावा केला. ओडिशातील जनतेने भाजपला संधी द्यावी. ज्या राज्यांत भाजपचा विशेष प्रभाव नाही ती विकासात मागे राहिल्याचे सांगत, नवीन पटनाईक सरकारवर त्यांनी टीका केली.
जनतेप्रति उत्तरदायित्व
प्रधानसेवक या नात्याने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मी सादर केला. मात्र गेल्या ७० वर्षांत असे उत्तरदायित्व सत्ताधाऱ्यांनी का दाखवले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. हा उत्सव नाही तर ही जबाबदारी आहे. दिल्लीत बसून मी तुम्हाला उपदेश करीत नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
जनतेचे आशीर्वाद विधायक कामास प्रोत्साहन देतात, असे मोदींनी सांगितले. तळपत्या उन्हातही इतक्या मोठय़ा संख्येने सभेला उपस्थिती लावली हे आपल्यावरील त्यांचे प्रेम आहे, असे मोदींनी सांगितले.