पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले असून त्यांनी त्या देशातील उद्योगधुरीणांशी चर्चा केली. पायाभूत व संरक्षण क्षेत्रात भारतामध्ये फ्रान्सने गुंतवणूक करावी व नवे तंत्रज्ञानही आणावे असा हेतू त्यात आहे.
मोदी यांचा फ्रान्सचा दौरा चार दिवसांचा असून त्यांचे ‘लेस इनव्हॅलिडेस’ या सातव्या शतकातील दरबारात स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदी यांनी फ्रान्सच्या उद्योगातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भारत हा फ्रान्सची गुंतवणूक व तंत्रज्ञान आपल्या देशात आणण्यासाठी इच्छुक आहे व मेक इन इंडिया योजनेत त्याचा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रातील जैतापूरसाठी अणुभट्टय़ा फ्रान्स देणार असून त्यावर चर्चा अपेक्षित आहे, तसेच राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा करारही अंतिम टप्प्यात जाऊ शकतो.
जैतापूर प्रकल्प फ्रान्सच्या ‘अरिवा’ कंपनीने घेतला असून त्यात सहा अणुभट्टय़ा बांधल्या जाणार आहेत. त्यांची क्षमता १० हजार मेगावॉट असेल.
 हे काम बरेच दिवस रेंगाळले आहे कारण विजेच्या दरावर मतभेद आहेत. १२६ राफेल विमाने भारताला देण्याचा करारही अडकला असून तो किमतीवर अडला आहे. मोदी यांनी फ्रान्समध्ये ‘नाव पे चर्चा’ या कार्यक्रमात अध्यक्ष फ्रँकॉइस ऑलाँद यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. ते साइन नदीवर बोटीने प्रवास करणार असून त्या वेळी चर्चा करतील.
सुब्रह्मण्यम स्वामींचा इशारा
राफेल विमानांचा करार सरकारने केला, तर आपण सरकारच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिला आहे. स्वामी हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून त्यांनी सांगितले की, राफेल विमानांचा करार युपीए सरकारच्या काळात वाटाघाटीला आला. राफेल विमाने लीबिया व इजिप्तमध्ये अपयशी ठरली आहेत हे माहिती असताना मोदी यांनी हा करार करू नये.
या विमानांची इंधन क्षमता योग्य नाही व कामगिरीही चांगली नाही. त्यामुळे जगातील कुठल्याही देशाने ही विमाने विकत घेतलेली नाहीत. मोदी यांनी हा करार केला तर तो रद्द करण्यासाठी आपल्याला लोकहिताची याचिका सादर करावी लागेल, असा इशारा स्वामी यांनी दिला.  
या विमानांची किंमत तेव्हा १० अब्ज डॉलर होती, आता ती अंदाजे २० अब्ज डॉलर असेल. २०१२ मध्ये भारताने सर्वात कमी दराची निविदा म्हणून पाच निविदातून राफेलची निविदा निवडली होती.