करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहा राज्यातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच, नाशिक, वर्धा, सांगली, कोल्हापूर, बीड, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा देखील पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला.

यावेळी मोदी म्हणाले, “करोना महमारीसारख्या संकटासमोर सर्वात जास्त महत्व हे आपली संवेदशीलता व धैर्यालाच असते. आपल्याला जनसमान्यांपर्यंत जाऊन अधिक काम करत रहावं लागणार आहे. नवनवीन आव्हानात आपल्याला नवनवीन पद्धती व उपायांची आवश्यकता असते, यामुळे हे आवश्यक होते की आपण आपले स्थानिक अनुभव एकमेकांना सांगावे. एक देश म्हणून आपण एकजुटीने काम करायला हवं. आपल्याला गावांगावात हा संदेश पोहचवायचा आहे, की आपल्याला आपलं गाव करोनामुक्त ठेवायचं आहे आणि प्रदीर्घ काळा जागरूकतेने प्रयत्न करायचे आहेत.”

आणखी वाचा- “जर राज्यांना बोलण्यास परवानगी नव्हती तर बोलवलं कशाला?”

तसेच, “मागील काही काळात देशात अॅक्टीव्ह केस कमी होत असल्याचे दिसून येत आहे, पण तुम्ही या दीड वर्षात हा अनुभव घेतला असेल की, जोपर्यंत हा संसर्ग उणे पातळीवर देखील अस्तित्वात आहे, तोपर्यंत आव्हान कायम आहे. अनेक वेळा जेव्हा केसेस कमी होऊ लागतात, तेव्हा लोकांना वाटतं की आता काळजीचं कारण नाही, करोना आता गेला आहे. मात्र अनुभव वेगळाच आहे. तपासणी, सुरक्षित अंतर आदींबाबत लोकांमध्ये गांभीर्य कमी होऊ नये, यासाठी सरकारी तंत्र, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी या सगळ्यांमध्ये एका सामूहिक जबाबदारीचा भाव आपल्याला पक्का करायला हवा. यामुळे प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. कोविड प्रतिबंधात्मक वर्तवणुक जसं मास्कचा वापर, हात धुणे आदींमध्ये जेव्हा काही उणीव राहत नाही व सर्व करोना निर्देशांचे नागरिकांकडून पालन केले जाते ते करोना विरोधातील लढाईसाठी अत्यंत महत्वाचे ठरते. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवल्याने, जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांमध्ये योग्य समन्वय राहतो व प्रभावी परिणाम स्वाभाविकपणे दिसू लागतात. असं देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.”