प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज (30 डिसेंबर) आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केलं. 2014साली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा आज  51 वा भाग होता तसंच या वर्षातील मोदींचा हा अखेरचा मन की बात कार्यक्रम होता. यावेळी मोदींनी पुण्याची सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिचा प्रकर्षाने उल्लेख केला. तब्बल 29 हजार किलोमीटर अंतर सायकलवरून 154 दिवसांत पार करत सर्वांत कमी वेळेत जगप्रदक्षिणा पूर्ण करुन आशियातील सर्वांत वेगवान महिला सायकलपटू ठरलेल्या वेदांगीचं मोदींनी कौतुक केलं. तसंच, कोरियामध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रीनगरच्या 12 वर्षाच्या हनाया निसारचंही कौतुक केलं.

यावेळी मोदींनी 2018 मध्ये सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. वर्ष 2018 हे सर्व भारतीयांना गौरवान्वित करणारे आणि त्यांची मान उंचावणारे वर्ष ठरले आहे,  वर्ष 2018 कायम स्मरणात राहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. यावर्षात जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिट’चे लोकार्पण झाले, तसंच ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्कारने संयुक्त राष्ट्राने भारताचा गौरव केला. 2018 मध्ये आयुषमान भारत योजना सुरू झाली, देशातल्या प्रत्येकर गावात वीज पोहोचली, सिक्किमला देशातील 100 वं विमानतळ लाभलं, देशाला पर्यावरण क्षेत्रातील चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला असं सांगत मला खात्री आहे की वर्ष 2019 भारतासाठी पूर्वीपेक्षा आणखी चांगले राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून पद सांभाळल्यानंतर त्याच वर्षी 5 ऑक्टोबर 2014 रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला होता. देशातील जनतेशी रेडिओच्या माध्यमातून ते संवाद साधतात. यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी 50 व्या भागात पंतप्रधान मोदींनी संविधान दिवस, गुरुनानक जयंतीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर ‘मन की बात’ केली होती.