अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक ‘टाइम’तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी होणाऱ्या ऑनलाइन मतदानात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांना मागे टाकले आहे. सध्या मोदी आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

गतवर्षी जगाला प्रभावित करणाऱ्या अथवा माध्यमांमध्ये प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीला ‘टाइम’तर्फे ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गेल्या वर्षी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत एकूण मतदानापैकी २१ टक्के मते घेऊन आघाडीवर आहेत. सध्या तरी त्यांच्या आसपास कुणीही पोहोचलेले नाही. ऑनलाइन मतदान प्रक्रियेत आतापर्यंत दुसऱ्या स्थानावर कोणताही नेता नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या स्थानी विकिलिक्सचे वादग्रस्त संस्थापक ज्युलियन असांजे आहेत. त्यांना ८ टक्के मते मिळाली आहेत.

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना सात टक्के मते मिळाली आहेत. त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना पाच टक्के मते मिळाली आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन अद्यापही बराक ओबामा यांच्या मागे आहेत. त्यांना प्रत्येकी ६ टक्के मते मिळाली आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना चार टक्के मते मिळाली आहेत. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना केवळ एक टक्का मते मिळाली आहेत. या मतदानात ३० व्यक्ती या पुरस्कारासाठी दावेदार आहेत. त्यात जागल्यांसह खेळाडू आणि पॉप गायकांचाही समावेश आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गला दोन टक्के लोकांचे समर्थन प्राप्त झाले आहे. तर अॅपलचे सीईओ टिम कूक, लोकप्रिय गायिका बियॉन्से नॉलेस आणि ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना प्रत्येकी एक टक्काच मते मिळाली आहेत.