मंत्री असो की ज्येष्ठ खासदार.. एरवी ते सभागृहात आले की सर्व जण उभे राहतात. पहिल्यांदा निवडून आलेले खासदार तर खांदे झुकवून अदबीने उभे राहतात. सभागृहात प्रवेश करताना हात जोडून उभे असलेल्यांवर करारी नजर टाकून ते आसनस्थ होतात. सहकारीमंत्री तर वचकूनच असतात.  व्यंकय्या नायडू व गृहमंत्री राजनाथ सिंह सोडले तर त्यांच्या आसनापाशी जाण्याचे धाडस फारसे कुणी दाखवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील वावर हा असा असतो. मोदींच्या चालण्यातील अदब व बोलण्यातला आब सहसा बदलत नाही. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पानिपतानंतर सोमवारपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान मोदी काहीसे वेगळे भासले.
लोकसभेत प्रवेश केल्यावर स्वत:च्या आसनावर बसण्याऐवजी विरोधी बाकांकडे जात मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापासून सर्वपक्षीय विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला. सत्तास्थापनेनंतर झालेल्या अधिवेशनात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी तेही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधी नेत्यांकडे अनौपचारिक चर्चेसाठी गेले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला अस्मान दाखवून नेत्यांना जमिनीवर आणले आहे. त्याचीच प्रचिती सभागृहात आली. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर १२ वाजून ३५ मिनिटांनी लोकसभेचे कामकाज सुरू होणार होते. तत्पूर्वी सात-आठ मिनिटांपूर्वीच पंतप्रधान मोदींचे लोकसभेत आगमन झाले.
मोदी विरोधी बाकांकडे येत असल्याचे लक्षात आल्यावर विरोधी पक्षांचे नेते जागेवर उभे होते. त्यात सोनिया गांधीदेखील होत्या.  सोनिया गांधी यांच्यासमोर मोदी आले. उभय नेत्यांनी परस्परांना हात जोडले खरे पण त्यांच्यात संवाद झाला नाही. काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी मात्र मोदी बोलत उभे राहिले. तेवढय़ात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन सभागृहात दाखल होत असल्याची घोषणा झाली. विरोधकांशी सुरू केलेला संवाद अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी पुन्हा आपल्या स्थानावर लगबगीने परतले!