राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत उत्तरं दिलं. करोनाच्या रुपानं देशावर मोठं संकट उद्भवलं, पण देशानं संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. जेव्हा भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं. तेव्हा भारतीयांच्या शिस्तीने देशाला संकटातून सावरलं, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी १३० कोटी भारतीयांचं कौतूक केलं.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर १५-१५ तास चर्चा झाली. रात्री १२ वाजेपर्यंत चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे महिला प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला. सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रपतींच्या भाषणातील प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता. देशांने संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. देश जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा जाताना ब्रिटिश म्हणत होते, भारत अनेक देशांचा महाद्वीप आहे आणि कुणीही या देशाला एकसंघ बनवू शकणार नाही. अशा घोषणा झाल्या होत्या. ज्यांच्या मनात अशी शंका होती, भारतीयांनी खोटी ठरवली. आज आपण जगासमोर आशेचा किरण म्हणून उभं आहोत. लोकशाही भारतीयांच्या नसानसात भिनली आहे. आपला देश विविधतेनं नटला असून, आपलं लक्ष देशाचा विकास आहे,” असं मोदी म्हणाले.

“करोनाचा काळ भारतासाठी कलाटणी देणारा काळ होता. देश जगासमोर मजबूतपणे उभा आहे. नव्या काळात भारताला सामर्थ्यवान व्हावं लागेल. त्यासाठी आत्मनिर्भर भारत विचाराला ताकद देण्याची गरज आहे. आमची धोरणं, नीती भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनं असायला हवीत. सभागृहात सदस्यांनी करोनावर सखोल चर्चा केली. प्रचंड लोकसंख्या असलेला देश करोनात कसा तग धरणार अशी भीती बोलली जात होती. पण, याचं श्रेय जात ते १३० कोटी भारतीयांना,” असं म्हणत मोदी यांनी देशवासीयांचं कौतुक केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“करोना संकटात आम्ही बदल सुरु ठेवले. भारतासारख्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही पावलं उचलणं गरजेचं होतं. त्याचा परिणाम आज गाड्यांचा सेल मोठ्या प्रमाणात होत आहे. जीएसटी संकलनेदेखील वाढत आहे. कृषी क्षेत्र कित्येक वर्षांपासून ज्या आव्हानांना सामोरं जात आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. त्या आव्हानांना आतापासून सामोरं जावं लागेल. येथे जी चर्चा झाली आहे आणि त्यातही काँग्रेसच्या सदस्यांकडून ते रंगावरुन चर्चा करत आहेत. त्यामधील कंटेंटवर चर्चा केली असती तर बरं झालं असतं,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.