सध्या देशातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा दावा केला.

“करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळालं. लॉकडाउन लागू करण्याचं आणि अनलॉक करण्याची वेळही योग्यच होती,” असं मोदी म्हणाले. “करोनाचं संकट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सतर्क राहणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं सणासुदीच्या वेळी सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही वेळ नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

केंद्र सरकारकडून आतापासूनच करोना विषाणूवरील लसीच्या वितरणाची तयारी केली जात आहे. आवश्यकता भासल्यास संपूर्ण देशात ही लस त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारनं सुरूवातीच्या टप्प्यात सर्व देशवासीयांना करोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी ५० हजार कोटी रूपयांपर्यंतची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीला करोनाची लस देण्यासाठी जवळपास ३८५ रूपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, अद्याप ना सरकारनं अथवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यानं याबाबत अधिकृत माहिती दिली. परंतु देशातील वैज्ञानिक करोनाची लस तयार करण्यावर युद्धपातळीवर काम करत आहेत. तर करोना लसीची चाचणीही आता पुढील टप्प्यावर पोहोचली आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं सत्तेत आल्यास बिहारमधील सर्व नागरिकांना मोफत करोनाची लस देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक स्तरातून यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.