X

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी जनतेला दिल्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात होणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला. पण त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात उपखंडातील जनतेने लोकशाही, शांतता, विकास आणि समृद्धतेसाठी एकत्र काम करण्याची गरज आहे असे पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव असताना पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांना हा संदेश पाठवला आहे.जम्मू-काश्मीरमधील फुटीरतवादी नेत्यांना निमंत्रण दिल्यामुळे भारताने दिल्लीत होणाऱ्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचा हा मेसेज टि्वट केला. भारत-पाकिस्तान संबंध आणखी बिघडू नयेत यासाठी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे असे पाकिस्तानी राजदूत सोहेल महमूद यांनी समारंभात बोलताना सांगितले. संबंध सामान्य करण्यासाठी दोन्ही देशांनी सुजाणपणा दाखवला पाहिजे. कठोरतेने वागण्याचा भूतकाळात फायदा झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही असे सोहेल महमूद यांनी सांगितले.

First Published on: March 23, 2019 11:27 am