पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर भाष्य करणारं भाषण दिलं. यामध्ये मोदींनी अनेक विषयांना हात घातला. अगदी करोनाविरुद्धची भारताच्या लढाईपासून ते कृषी कायद्यांपर्यंत आणि काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधापासून २०४७ चा भारत इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर मोदींनी आपली भूमिका भाषणामधून स्पष्ट केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालेल्या चर्चेबद्दलही मोदींनी समाधान व्यक्त केलं. मात्र आपल्या भाषणाचा शेवट करताना मोदींनी मोदी है मौका लीजिए, म्हणत विरोधकांना आपल्या खास शैलीमध्ये टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना सव्वा तासाचे भाषण केलं. यामध्ये त्यांनी करोनाविरुद्ध भारतीयांनी ज्या पद्धतीने लढा दिला त्याचं कौतुक केलं. तसेच करोना संकटामध्ये भारताने जागतिक स्तरावर आपली प्रतिमा आणखीन भक्कम आणि सक्षम देश म्हणून तयार केल्याचंही मोदींनी म्हटलं. पुढे बोलता मोदींनी कृषी कायद्यांवरुन सुरु असणाऱ्या वादावर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्त्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्त्यांपर्यंत अनेक गोष्टींचे दाखले देत काँग्रेसने शेतकरी सुधारणांसंदर्भात कशाप्रकारे यू-टर्न घेतला आहे याचा पाढा वाचून दाखवला. तसेच आंदोलन करणाऱ्या काँग्रेसने हे बदल शेतकऱ्यांच्या भल्यासाठी गरजेचे असल्याचं त्यांना सांगायला हवं असं मतही मोदींनी व्यक्त केलं. भाषणाच्या शेवटी मोदींनी सीमेवर अनेक आव्हान मागील काही काळात आली मात्र आपल्या शूर जवानांनी ती परतवून लावली. आम्ही सीमांचे संरक्षण करण्यास सक्षम आहोत असंही मोदींनी स्पष्ट केलं.

आपलं भाषण संपवताना मोदींनी खास शैलीत विरोधकांना कानपिचक्या दिल्या. “अधिवेशनादरम्यान सदनामध्ये झालेल्या चर्चेचा दर्जाही चांगला होता. चर्चा ज्या वातावरणामध्ये झाली ते ही चांगलं होतं त्यामुळे यामधून अनेक लाभ झाले. माझ्यावरही अनेकांनी टीका केली. ज्यापद्धतीने माझ्याबद्दल जे जे काही बोलता येईल ते बोललं गेलं. मात्र मला खूप आनंद झाला कारण मी किमान तुमच्या कमी तर आलो,” असं मोदींनी म्हटल्यानंतर सदनात एकच हशा पिकला.

पुढे बोलताना मोदींनी, “करोनामुळे तुम्हाला जास्त बाहेर पडता येत नसेल. घरात अडकून पडला असाल. घरातही उगच चीडचीड होत असेल. आता त्यातला थोडा राग येथे व्यक्त केला तर तुमचं मन किती हलकं झालं असेल. आता घरात तुम्ही किती आनंदाने आणि निवांतपणे वेळ घालवत असाल. तुम्हाला हा जो आनंद मिळाला आहे त्यासाठी मी उपयोगी पडलो हे सुद्धा मी माझं सौभाग्य मानतो. हा आनंद तुम्ही सतत घेत राहा हीच माझी इच्छा आहे. चर्चा करत राहा. बोलत राहा. सदनाला चर्चेच्या माध्यमातून सतत जिवंत ठेवा. मोदी है मौका लीजिए,” म्हणत धन्यवाद करुन आपलं भाषणं संपवलं. मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांमध्ये एकच हशा पिकल्याचे चित्र पहायला मिळालं.