2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले होते. तसेच आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना मेहनत घेण्यास सुरूवात करण्याचा सल्ला दिला आहे. 2024 मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकीत जिंकण्यासाठी खासदारांनी आपल्या मतदारसंघात विकास करण्याची गरज आहे. जेणेकरून खासदारांना त्यांच्या नावाची आणि ओळखीची मदत घेण्याची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.

नुकतीच भाजपा खासदारांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत आलेले अनुभव खासदार गौतम गंभीर यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी आपल्या क्रिकेट संघाच्या होणाऱ्या बैठकांचीही आठवण काढली. “कार्यशाळेमुळे आपल्याला भारतीय संघात असताना होणाऱ्या काही महत्त्वाच्या बैठकांची आठवण आली. परंतु या बैठकांचे परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होत असतात,” असेही ते म्हणाले. “मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आपल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या माझ्यावर खुप दडपण आलं होतं. तो माझा पदार्पणाचा सामना होता, या गोष्टी आजही माझ्या आठवणीत आहेत. 2011 मध्येही आम्ही वर्ल्डकप जिंकला होता. त्या सामन्याच्या दिवशी संध्याकाळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील चित्रही बदललेच होतं. या गोष्टी आजची माझ्या आठवणीत आहेत,” असे गंभीर यावेळी म्हणाले.

“या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला दृष्टीकोन अनौपचारीक ठेवला होता. तसेच त्यांनी दुपारच्या भोजनादरम्यान त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी त्या ठिकाणी असलेली बास्केट उचलली आणि सर्व खासदारांना चपात्या वाढण्यास सुरूवात केली,” असेही गंभीर यावेळी म्हणाले. “मोदींनी बैठकीत सर्वांना सकारात्मक राहून काम करण्याचा सल्ला दिला. तसेच सांस्कृतिक आणि मानवी साधनसंपत्तीचा वापर करून भारताला महान राष्ट्र बनवण्यासाठी मदत करावी,” असेही ते म्हणाले. “तुम्ही निवडून आला आहात आणि आता साडेचार वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व प्रश्न मार्गी लावा, जेणेकरून तुम्हाला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माझ्या नावावर आणि ओळखीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही,” असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे गंभीर यांनी सांगितले.