प्रचारसभेत पंतप्रधानांची टीका; ‘तृणमूल’ला जनता सत्तेतून घालविणार

, ताकी (प. बंगाल)

पश्चिम बंगालमध्ये जे काही आहे ते नष्ट करण्याचे काम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. सत्तेच्या नशेने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम ममता करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

साऱ्या देशाने चित्रवाणीवर प्रचारमोर्चामध्ये काय झाले हे पाहिले आहे. त्यामुळे आता निवडणूक निकालाची वाट जनता आतुरतेने पाहात आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ममता दीदींचे गुंड बंदुका, बॉम्ब घेऊन विध्वंस करत आहेत असा आरोप पंतप्रधानांनी २४ परगणी जिल्ह्य़ातील सभेत केला. भाजपच्या प्रभावामुळे ममता घाबरल्या आहेत. ममतांना मुख्यमंत्रीपदावर बसवून जनतेने त्यांना मान-सन्मान दिला. मात्र त्यांना सत्तेची नशा चढली अशी टीका पंतप्रधानांनी केली. तुम्ही चिटफंडाद्वारे जनतेचे पैसे लुटले, त्यांनी जेव्हा हिशेब मागितला तेव्हा तुम्ही त्यांना लक्ष करत आहात असे पंतप्रधानांनी सांगितले. लोकशाहीद्वारे ममतांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. मात्र गेल्या पाच वर्षांत तुमचे बदलते रंग जनतेने पाहिले आहेत असा टोला पंतप्रधानांनी लगावला. तुम्हाला आता जनता घरी पाठवेल असा इशारा पंतप्रधानांनी दिला.

हिंसाचारात तृणमूलचाच हात -अमित शहा

नवी दिल्ली : कोलकात्यात प्रचार मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारामागे तृणमूल काँग्रेसचा हात आहे, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकारात मूक प्रेक्षकाची भूमिका पार पाडली, असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षण नसते तर मी सहीसलामत बाहेर पडू शकलो नसतो, कारण आमच्या गाडय़ांवर कोलकात्यात तृणमूलच्या गुंडांनी दगडफेक केली, असा आरोप शहा यांनी पत्रकार परिषदेत केला. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या सहाही टप्प्यात हिंसाचार झाला असून भाजप सर्व राज्यात निवडणूक लढवत असताना कुठेही हिंसाचार झाला नाही, फक्त याच राज्यात तो झाला, कारण तेथे तृणमूल सत्तेवर आहे.

तृणमूलच्या गुंडांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. हे कृत्य सहानुभूती मिळवण्यासाठी करण्यात आले, कारण ममता बॅनर्जीप्रणीत तृणमूलची उलटगणती सुरू झाली आहे हे त्यांना कळून चुकले आहे. निवडणूक आयोगाने यात मूक प्रेक्षकाची भूमिका घेतली असून निवडणुकीपूर्वीच गुंडांना अटक करायला हवी होती. निवडणूक आयोगाने दुटप्पी भूमिका घेतली असून तृणमूलला झुक ते माप दिले आहे, असा आरोप शहा यांनी केला.