पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिरात आणि ओमानच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. अबुधाबीत भारतीय समुदायासमोर आपलं मनोगत व्यक्त करताना मोदींनी जीएसटी, नोटबंदी आणि इतर मुद्द्यांवर आपलं सरकार प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. आपल्या सरकारने घेतलेले प्रत्येक निर्णय हे सामन्य माणसाच्या हिताचे होते आणि त्या निर्णयांच्या बाजूने सामन्य माणूस उभाही राहिला. मात्र विरोधक अजुनही नोटबंदीचा धक्का पचवू शकले नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसला पुन्हा एकदा टीकेचं लक्ष्य केलं.

संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर अबुधाबी येथील हिंदू मंदीराच्या पायाभरणीचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. “आपण जुनं घर सोडून नवीन घरात रहायला गेलो की पहिले दिवस आपणही काहीसे चाचपडत फिरत असतो. कोणती गोष्ट नेमकी कुठे ठेवली आहे याचा आपल्याला पत्ता लागत नाही. भारतातही ७० वर्षांपासून सुरु असलेली व्यवस्था बदलण्या थोडासा कालावधी जाईल, मात्र बदल नक्की घडून येतील”, असं म्हणत मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला.

याव्यतिरीक्त जीएसटी कराच्या अंमलबजावणीवरुनही मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. जीएसटी लागू करायचा की नाही हा प्रश्नाचं घोंगडं काँग्रेसने ७ वर्ष भिजत ठेवलं. मात्र आपल्या सरकारने सत्तेवर येताच जीएसटी कराची अंमलबजावणी केल्याचं सांगत, विरोधकांपुढे केवळ राजकारण करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरला नसल्याचंही मोदी म्हणाले. मोदींच्या या छोटेखानी भाषणाला सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. भाषणादरम्यान मोदी…मोदीच्या नाऱ्यांनी सभागृह दणाणून गेलं होतं. यानंतर पंतप्रधान मोदी ओमानला रवाना होणार आहेत.