पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या कामगिरीबद्दल कौतुक केले.

“मिताली राज यांनी, अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटर बनल्या आहेत. त्यांच्या या उपलब्धतेसाठी त्यांचे खूप-खूप अभिनंदन. ”

पंतप्रधानांच्या अभिनंदनाबद्दल मिताली राज हिने त्यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, मी केलेल्या विक्रमाबद्दल नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रशंसेमुळे मी भारावून गेली आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे.

मिताली राज ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आपल्या सर्वांना हे जाणुन अजून आनंद होईल की, हा टप्पा पार करणारी मिताली राज ही जगभरातील केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे! याआधी हा टप्पा इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सने पूर्ण केला आहे. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली आहे. पण मिताली अजूनही खेळत आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील मिताली लवकरच मिळवेल अशी आशा सर्व भारतीयांना वाटते आहे.