करोना विरोधात लढाई करण्यासाठी सगळ्या देशाने एकजूट करावी. ही एकजूट दाखवण्यासाठी ५ एप्रिल रोजी म्हणजेच आज रात्री ९ वाजता, ९ मिनिटांसाठी देशभरातल्या जनतेने एक दिवा पेटवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यानंतर अवघ्या देशात करोनाविरोधातली एकजूट दिव्यातील प्रकाशरुपाने पाहण्यास मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी लाईट बंद करुन समई प्रज्ज्वलित केली या संदर्भातला व्हिडीओ एएनआयने ट्विट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशातल्या आणि इतर राज्यांमधल्या सगळ्यांनीच करोनाविरोधातल्या या लढाईत भारताची एकजूट दाखवली. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा एक दिवा लावण्याचं आवाहन देशवासीयांना केलं होतं तेव्हा त्यांच्या या निर्णयावर टीका झाली होती. मात्र आज दिव्यातील प्रकाशरुपाने देशातली करोनाविरोधातली एकजूट पाहण्यास मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा देशवासीयांशी एका व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशाला एक दिवा ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी पेटवा आणि करोनाविरोधात देशाची असलेली एकजूट दाखवा असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला अवघ्या देशाने सकारात्मक प्रतिसाद दिला. देशातल्या बहुतांश नागरिकांनी आपल्या घरात राहून दिवा लावला आणि करोना विरोधातली एकजूट दाखवून दिली.