गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयांच्या मृत्यू प्रकरणी आता योगी आदित्यनाथ सरकारनं अहवाल द्यावा असं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. तसंच या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत गोरखपूरच्या रूग्णालयात सुमारे ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपलनीही या प्रकरणी राजीनामा दिला आहे. गोरखपूर दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान स्वतः उत्तर प्रदेशातले आरोग्य अधिकारी आणि केंद्रातले अधिकारी यांच्या संपर्कात आहेत. याप्रकरणी आता उत्तर प्रदेश सरकारनं विस्तृत अहवाल सादर करावा असं ट्विट पंतप्रधान कार्यालयानं केलं आहे.

केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव सी. के. मिश्रा हे दोघेही गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयाचा दौरा करणार आहेत आणि मृत मुलांच्या पालकांची भेट घेणार आहेत, तसंच ही दुर्घटना नेमकी का घडली याची कारणं आणि त्यासाठी कोण कोण जबाबदार आहे हेदेखील जाणून घेणार आहेत. बी.आर.डी. कॉलेज रूग्णालय प्रमुखांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पदावरून हटविण्यात आलं आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), सफदरजंग रूग्णालय आणि राम मनोहर लोहिया रूग्णालयातून वैद्यकीय तज्ज्ञांचं एक पथक गोरखपूरच्या रूग्णालयात जाणार आहे. या रूग्णालयातील मृतांचा आकडा ६३ वर गेला आहे, येत्या काही दिवसात हा आकडा वाढू नये म्हणून हे पथक पाठवलं जाणार असल्याचंही केंद्रानं म्हटलं आहे.

एकीकडे केंद्राकडून ही सगळी तयारी सुरू असतानाच बाबा राघव दास रूग्णालयात असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर वेळेवर येत नसल्याची तक्रार केली आहे. तसंच आत्ता रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाहीये आणि औषधोपचारही वेळेवर दिले जात नाहीत असाही आरोप करण्यात येतो आहे. गोरखपूर रूग्णालयात झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी विरोधी पक्षांनी योगी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.