पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे अभिमन्यू आहेत व ते चक्रव्यूहाचा भेद करतील, असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूल्यमापन करण्यासाठी धीर धरा. सरकार बदलले असले तरी सरकार चालवणारी यंत्रणा बदललेली नाही.
हरिद्वार येथे साधूंच्या मेळाव्यात त्यांनी सांगितले की, मोदी हे चक्रव्यूहातील अभिमन्यू आहेत. ते महाभारतात शत्रूच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूच्या कथेप्रमाणे आहे. ‘हमारे अभिमन्यू चक्रव्यूह को पार करेंगे’ असे भागवत म्हणाले. माजी मंत्री चिन्मयानंद यांच्या परमार्थ आश्रमात साधूंपुढे ते म्हणाले की, स्वयंसेवक सत्तेवर आले आहेत व ते चांगले काम करणारच आहेत. ‘उनके मन में करने की इच्छा हैं. देखना हैं, कितना कर पाते हैं. हमें पूरा विश्वास हैं की वो हमारी देश और संतसमाज की आशाओं पर खरे उतरेंगे.’ असेही ते म्हणाले.
भागवत यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले की, सत्ताधारी पक्ष बदलला आहे हे खरे आहे, पण सरकारी यंत्रणा तीच आहे, त्यांचा रोख नोकरशाहीवर होता. नव्या पुढाकारात ते नेहमी अडचणी आणतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुणीही राम मंदिराचा प्रश्न त्यांना विचारला नाही. यावेळी राममंदिर चळवळीतील अनेक संत उपस्थित होते.