18 January 2021

News Flash

निवडणूक देशाने हरली म्हणणं यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही – नरेंद्र मोदी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं

ही निवडणूक देशाने हरली असं म्हणणं यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. अमेठीत भारताचा पराभव झाला का ? वायनाडमध्ये, रायबरेलीत भारताचा पराभव झाला का ? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी २०१९ ची निवडणूक देशाच्या जनतेने लढली असंही म्हटलं. जनतेने सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवली असं त्यांना यावेळी सांगितलं.

देशातील लोकांना विचार करायला लावणारी ही गोष्ट असून काँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव आहे का ? असा सवाल नरेंद्र मोदींनी विचारला. अहंकाराची एक मर्यादा असते अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. देशातील शेतकऱ्यांचाही अपमानही कऱण्यात आला. आपल्या देशातील शेतकरी बिकाऊ नाही असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. प्रसारमाध्यमांमुळे निवडणूक जिंकली जाते का ? अशी विचारणा करताना मीडिया कोणी विकत घेऊ शकतं का ? असंही त्यांनी विचारलं.

देशात एक नवा आजार सुरु आहे. ईव्हीएमसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कधीकाळ आमचीही संख्या दोन होती. पण आमचा देशातील जनतेवर विश्वास होता. कष्ट करण्याची आमची तयारी होती. विश्वासाने आम्ही पुन्हा पक्ष उभा केला. हीच आपल्या नेतृत्त्वाची कसोटी असते. त्यावेली आम्ही रडत बसलो नाही. आम्ही प्रयत्न केले. पण जेव्हा स्वत:वर विश्वास नसते तेव्हा कारणं सांगितली जातात. आपल्या चुका स्वीकारण्याची तयारी नसणारे ईव्हीएमला दोष देत फिरतात अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

आम्हीदेखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. पण जेव्हा स्पष्टता आली तेव्हा आम्ही त्याचा स्विकार केला असं सांगताना काँग्रेसनेच ईव्हीएमसंबंधी नियम तयार केले सांगत आम्ही सगळं केलं म्हणणाऱ्यांनी हेच केलं आहे असा टोला मोदींनी लगावला. तुम्ही विजय पचवू शकला नाहीत आणि पराभवही स्विकारत नाही आहात अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.

यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे. चर्चा तरी करावी असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. दरवाजे बंद केल्याने चर्चा होत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

नव्या भारताचा विरोध होत असल्याने मला आश्चर्य वाटत आहे. आपल्याला तो जुना भारत हवा आहे का जिथे फक्त घोटाळ्यांच्या बातम्या होत्या, रेल्वे आरक्षणासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं, पासपोर्टसाठी महिनाभर वाट पहावं लागायचं, जिथे प्रत्येक गोष्टीसाठी मुलाखत घेतली जायची आणि त्यातून भ्रष्टाचार केला जायचा. देशातील जनतेला नवा भारत हवा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार असं यावेळी नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं.

जनतेच्या निर्णयाचा गळा दाबण्याचा प्रयत्न होता कामा नये अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. सकारात्मक विचार मांडा, आम्ही स्विकारण्यास तयार आहोत. कारण आम्हाला देशाचं भलं करायचं आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. झारखंड झुंडबळीतील आरोपींना कठीण शिक्षा झाली पाहिजे. घटनेचं दुख: मलाही आहे. पण त्याचं राजकारण करणं चुकीचं आहे. झारखंडची बदनामी केली जाऊ नये असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी सर्वांना प्रयत्न केला पाहिजे असंही यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

नरेंद्र मोदींनी शीख दंगलीचा उल्लेख करत ज्यांच्यावर आरोप करण्यात आले ते आजही त्यांच्या पक्षात आहेत अशी टीका केली. मी माझ्या पक्षातील नेत्यांनाही कोणतंही वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा सल्ला देतो. सार्वजनिक आयुष्यात नियमांचं पालन होणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

सरदार वल्लभभाई पटेल आज असते तर जम्मू काश्मीरची समस्या निर्माण झाली नसती. ते आज असते तर गावांची परिस्थिती वेगळी असती असं आमचं मानणं आहे. हे चुकीचं असू शकतं असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी कुछ दिन गुजारिये गुजरातमे असं म्हणत निमंत्रणही दिलं.

बिहारमधील चमकी ताप मृत्यू घटना आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरकारच्या अपयशांपैकी हे एक आहे. मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे. लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी जनजागृती कऱण्याची गरज आहे. हे दुसऱ्या राज्यातही होऊ शकतं असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 2:15 pm

Web Title: pm narendra modi rajya sabha congress president ramnath kovind assembly session sgy 87
Next Stories
1 नमाजला विरोध करण्यासाठी भाजपाचे भर रस्त्यात हनुमान चालीसा पठण
2 आसाम : एनआरसीची नवी यादी जाहीर; एक लाखाहून अधिक लोकांची नावे वगळली
3 इराकमध्ये प्रभू श्रीरामचंद्र व हनुमानाची लेणी? भारतीय दुतावासाला डोंगरात सापडला पुरावा
Just Now!
X