शेती क्षेत्राचा कायापालट होण्याचा विश्वास

नवी दिल्ली : कृषी क्षेत्राबाबतची दोन विधेयके रविवारी मंजूर झाल्यानंतर, हा भारतीय कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यातून देशातील कोटय़वधी शेतकऱ्यांचे सक्षमीकरण साधले जाऊन कृषी क्षेत्राचा पूर्णत: कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर झाल्यानंतर मोदी यांनी ट्विटरवर ही भावना व्यक्त केली. मोदी म्हणाले की, या प्रस्तावित कायद्यांमुळे अनेक अडचणींतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांवर अनेक दशके असलेल्या निर्बंधांमुळे त्यांची मध्यस्थांकडून लूट झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी सध्या सुरू असलेली शासकीय हमीभावाची योजना यानंतरही अस्तित्वात राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या विधेयकांविरोधात पंजाब आणि हरियाणात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रस्तावित कायद्यांमुळे सध्याची यंत्रणा नष्ट होऊन शेतकऱ्यांना बडय़ा कंपन्यांच्या दयेवर जगावे लागेल, असा आरोप आंदोलकांचे नेते करीत आहेत.

पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांशी ट्विटरवर पंजाबीत संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही याआधी सांगितले आहे आणि पुन्हा सांगत आहोत की, किमान हमीदराची पद्धत कायम राहणार आहे. त्या दराने सरकारकडून होणारी खरेदी सुरूच राहील.  या विधेयकांना लोकसभेत आधीच मंजुरी मिळाली आहे.

या प्रस्तावित कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आणि त्यांची भरभराट साधण्याचा हेतू साध्य करण्यास मदत होणार आहे. आपल्या कृषी क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत गरज आहे. यातून उद्यमी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. उत्पादनवाढीसाठी असे तंत्रज्ञान मिळविण्यास या कायद्यांची मदत होणार आहे. हे निश्चितच स्वागतार्ह आहे.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान