करोनाशी लढताना आपल्याला आर्थिक आघाडीवर पूर्ण सामर्थ्याने वाटचाल करायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या सात राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकीला हजेरी लावली. देशातील ६३ टक्के अॅक्टिव्ह केसेस या सात राज्यांमध्ये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. “प्रभावी टेस्टिंग, ट्रेसिंग, उपचार, पाळत ठेवणे आणि स्पष्ट संदेश याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज,” असल्याचं मोदींनी सांगितलं. करोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने मोदींनी त्याकडेही लक्ष वेधलं. “करोनाशी लढताना आपल्याला आर्थिक आघाडीवर पूर्ण सामर्थ्याने वाटचाल करायची,” असल्याचं त्यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, “करोनाशी लढताना स्पष्ट संदेश देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा लक्षणं दिसत नाहीत. अशा परिस्थितीत अफवा वाढू शकतात. टेस्टिंग योग्य नसल्याची शंका लोकांच्या मनात येऊ शकते. काही लोक संसर्गाची तीव्रता कमी लेखण्याची चूक देखील करु शकतात”.

नरेंद्र मोदींनी यावेळी मास्क वापरण्यावर भर देण्यास सांगितलं. “मास्क घालण्याची सवय करुन घेणं कठीण आहे. पण जर आपण त्याला आपल्या जीवनाचा भाग केलं नाही तर हवे ते निकाल मिळणं कठीण आहे,” असं मोदींनी सांगितलं.

“आता आपल्याला करोनाशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे. आरोग्याशी संबंधित तसंच ट्रॅकिंग, ट्रेसिंगचं नेटवर्क अजून मजबूत करायचं आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. “जे १-२ दिवसांची लॉकडाउन असतात ते करोना रोखण्यात किती प्रभावी ठरतात याचा प्रत्येक राज्याने विचार केला पाहिजे. यामुळे राज्यातील आर्थिक गोष्टी सुरु होण्यात अडचणी तर येत नाहीत ना? यावर गांभीर्याने विचार करा” असंही मोदींनी सांगितलं.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी या राज्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये राज्यांचे आरोग्यमंत्रीही उपस्थित होते.