मोदींच्या हस्ते चाकणमधील जनरल इलेक्ट्रिक या कंपनीच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आदी मान्यवर उपस्थित होते.  त्यानंतर त्यांनी उद्योग समुहातील शिष्टमंडळाशी काही वेळ संवाद साधला.
मोदी म्हणाले की,  आपल्याकडील तरुणांमध्ये प्रचंड कौशल्य आहे. कौशल्य आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून तरुणांमध्ये अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद आहे. औद्योगिक प्रगतीमध्ये तरुणांचे स्वागत आहे. आज जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला आणखी वाढ करण्याची संधी आहे. शेती, सेवा व उत्पादन निर्मिती या तिन्ही सेक्टरमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. भारताच्या विकासाची जगभर चर्चा होत आहे. जगभरातील व्यापाऱ्यांचे भारताकडे लक्ष आहे. आपल्याकडील युवकांकडे असलेल्या कौशल्यामुळे त्यांच्यात जगभरातील पैसा खेचून आणण्याची क्षमता आहे. भारतीय तरुणवर्ग विकासाच्या केंद्रस्थानी असल्याचेही ते म्हणाले.
बारामतीत नरेंद्र मोदी कृषी क्षेत्रातील प्रयोगाची पाहणी करणार आहेत. माळेगाव सहकारी कारखान्याच्या परिसरात मोदी शेतकऱ्यांसोबत संवादही साधणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींचा गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानी भोजनाचा कार्यक्रम आहे.