नोटाबंदीमुळे देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलने केली जात आहे. या आंदोलनाचे लोण संसदेतही पोहोचले असून गेल्या आठवड्यापासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन यामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यातील संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे वाया गेले होते. या आठवड्यातही हीच परिस्थिती कायम आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. मोदींच्या उद्दामपणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने पंतप्रधान मोदींना नोटाबंदीबाबत संसदेत बोलण्याची मागणी केली जात आहे. मात्र मोदी हे संसदेबाहेर बोलण्याला प्राधान्य देत असून हा संसदेचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीबाबत संसदेतील सध्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सीताराम येचुरी यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नोटाबंदीबाबतच्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. सध्या संसदेत जी परिस्थिती उद्धभवलेली आहे. त्यास मोदींचा उद्दामपणा कारणीभूत आहे. त्यांनी बोलावे यासाठी वारंवार विनंती केली जाते. पण ते टीव्ही, रेडिओ व सभांमध्येच बोलत आहेत. संसदेचा हा अपमान आहे. त्यांच्याविरोधात आम्ही संसदेचा अवमान केल्याची नोटीस पाठवू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. संसदेला उत्तर देणे त्यांची जबाबदारी आहे. परंतु, ते त्यापासून पळ काढतात. आम्ही सर्व विरोधी पक्ष आता पुन्हा याबाबत चर्चा करणार आहोत.

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांकडून नोटाबंदीवरून गोंधळ सुरू आहे. सोमवारी लोकसभेत ‘गली गली में शेर है, अच्छे दिन दूर है’, ‘मोदी जरा शर्म करो, शर्म करो’ अशी काँग्रेसकडून आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजनांच्या अनेक विनवण्यांना विरोधकांनी धूप घातली नाही. पंतप्रधान सभागृहात आलेच पाहिजेत आणि या सगळ्या प्रकाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झालीच पाहिजे यावर काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे अडून बसले होते. या वेळी महाजन आणि खरगे यांच्यामध्ये जुगलबंदी झाली. सदस्य ऐकत नसल्याचे पाहून संतापलेल्या महाजन म्हणाल्या, टीव्हीवर दिसण्यासाठी तुम्ही गोंधळ घालताय. त्यावर खरगे म्हणाले, टीव्हीचा जन्म होण्यापूर्वीपासून आम्ही संघर्ष करतोय. टीव्हीचे वेड आम्हाला नाही. आम्ही सामान्यांचे प्रश्न मांडतो आहोत.