फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ परिषदेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पहाटे भारतात परतले. मायदेशात परतल्यानंतर मोदी प्रथम माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जी-७ परिषदेला गेल्यामुळे मोदींना अरूण जेटलींच्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहता आले नव्हते.

मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी जेटलींच्या निधनांनतर दिली होती. जेटलींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करुन दु:ख व्यक्त केले आणि त्यांचे सांत्वन केले होते. तर‘तुम्ही देशासाठी परदेश दौऱ्यावर गेला आहात, दौरा रद्द करु नका’ अशी विनंती जेटलींच्या मुलाने मोदींना विनंती केली होती.

(आणखी वाचा : ‘तुम्ही देशासाठी परदेश दौऱ्यावर गेला आहात, दौरा रद्द करु नका’; जेटलींच्या मुलाची मोदींना विनंती )

पंतप्रधान मोदींचे मंगळवारी पहाटे तीन वाजून ३० मिनिटांनी भारतात आगमन झाले आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, आपल्या नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून मोदी आपले मित्र अरूण जेटली यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत.

मोदी-ट्रम्प भेट
जी ७ परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड टॅम्प यांच्यासह अनेक जगभरातील दिग्गज नेत्यांना भेटले. काश्मीर प्रश्न हा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यापुरता असल्याचे स्पष्ट करीत त्यात त्रयस्थ देशाने मध्यस्थी करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत सोमवारी सपशेल फेटाळून लावली. आपापसातील प्रश्न भारत आणि पाकिस्तान चर्चा करून सोडवू शकतात. त्यासाठी अन्य तिसऱ्या देशाला नाहक त्रास देण्याची आमची इच्छा नाही, असेही मोदी यांनी नमूद केले. फ्रान्सच्या बिआरित्झ शहरात जी-७ परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली.

जी ७ परिषदेत काय म्हणाले मोदी –

शाश्वत भवितव्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे, जलसंधारण, सौरऊर्जेचा वापर, तसेच वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण याबाबत भारताने मोठय़ा प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जी ७ परिषदेत पर्यावरणाबाबतच्या सत्रात केलेल्या भाषणात भर दिला. फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विशेष निमंत्रणावरून मोदी हे फ्रान्सच्या बियारित्झ शहरात होत असलेल्या जी ७ परिषदेला उपस्थित आहेत.