पंतप्रधान कार्यालयाने पी.के.मिश्रा, पी.के.सिन्हा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कार्यकक्षा निश्चित केली आहे. काही दिवसांपूर्वीच पी.के.मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव आणि पी.के.सिन्हा यांची प्रधान सल्लागार या पदांवर नियुक्ती झाली आहे. पीएमओकडून या संदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे.

प्रधान सचिव मिश्रा धोरणात्मक मुद्दे कार्मिक, कायदा मंत्रालयाशी संबंधित विषय, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती संदर्भात विषय हाताळतील. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विषय, भ्रष्टाचार विरोधी युनिट असे महत्वाचे विषय हाताळतील.नियुक्त्यांचा विषय वगळता एनएसए अजित डोवाल यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षेशी संदर्भात जबाबदारी असेल तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित असलेले धोरणात्मक विषय, संरक्षण, अवकाश, अणू ऊर्जा आणि ‘रॉ’ यांच्याशी संबंधित कामकाजावर एनएसए डोवाल लक्ष ठेवतील.

रासायनिक शस्त्रांसंदर्भात धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. त्याशिवाय नागालँडमधील फुटीरतावादी एनएससीएन बरोबर चर्चेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मिश्रा पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव होते. मागच्या आठवडयात त्यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी मिश्रा यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.