ओडिशात हिंदाल्को कंपनीला बहाल करण्यात आलेल्या कोळसा खाणवाटपाबाबतची फाइल पंतप्रधानांच्या कार्यालयाने शुक्रवारी सीबीआयकडे सुपूर्द केली. या फाइलची मागणी सीबीआयने केली होती.
सदर फाइल सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली असून त्याबाबतची पोचपावती आम्ही घेतली असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.
यापेक्षाही अन्य कोणत्याही माहितीची गरज असल्यास ती पुरविण्याची तयारी असल्याचेही सीबीआयकडे स्पष्ट करण्यात आल्याचे हा अधिकारी म्हणाला.
उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांनी प्रवर्तित केलेल्या हिंदाल्कोला खाणवाटप करण्यात आल्याप्रकरणी पंतप्रधानांना विरोधी पक्षांकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. मात्र हिंदाल्कोला खाण देण्याचा निर्णय योग्यच होता आणि तो गुणवत्तेच्या आदारावरच घेण्यात आला होता, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.बिर्ला आणि कोळसा खात्याचे माजी सचिव पी. सी. परख यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर नोंदविल्यानंतर या वादाला तोंड फुटले. आपल्याला आरोपी म्हणून संबोधण्यात येत असेल तर पंतप्रधानांनी फेरनिर्णयाला मान्यता दिल्याने त्यांनाही आरोपी केले पाहिजे, असे परख म्हणाले.