पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रकारच्या सोशल मीडियामधून अलिप्त राहण्याचा विचार ट्विटरवरुन बोलून दाखवल्यानंतर देशात सर्वत्र अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काहींनी त्यांना सल्ले द्यायला सुरुवात केली आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, काही लोकांच्या मते मोदी रविवारी काहीतरी नवी कल्पना घेऊन येऊ शकतात.

भारत सरकार एखादा नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार असल्याचं हे सूचक असल्याचं काहींचं म्हणणं आहे. मात्र, यासाठी आपल्याला रविवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण पंतप्रधान नेहमीच अशा प्रकारे धक्कादायक पावलं उचलत असतात. यापूर्वीही अनेकदा देशवासियांनी याचा अनुभव घेतला आहे.

पंतप्रधानांच्या या ट्विटवर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, “जगात असे खूपच कमी राजकीय नेते असतील ज्यांनी मोदींप्रमाणे सोशल मीडियाचा इतक्या चांगल्या प्रकारे वापर केला असेल. पंतप्रधानांना नक्की काय म्हणायचंय याबाबत अत्ताच कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. सोशल मीडिया आपल्या समाजाचे प्रतिबिंब आहे. तिथं चांगले आणि वाईट लोकही आहेत. मात्र, पंतप्रधानांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात नक्की काय आहे यासाठी आपल्याला रविवारपर्यंत वाट पहावी लागेल.”

आणखी वाचा- सोशल मीडियाला रामराम करण्याचा विचार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकांमध्ये आर्श्चयाची भावना

पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमुळे लोकांच्या मनामध्ये आश्चर्याची भावना आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करुन लोक त्यांना असं न करण्याचा सल्ला देत आहेत. काहींनी तर, आम्ही तुमच्यामुळेच ट्विटरशी जोडलो गेलो असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांचे ट्विटरवर ५ कोटी ३३ लाख, फेसबुकवर ४ कोटी ४५ लाख फॉलोवर्स आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोवर्सची संख्या ३ कोटी ५२ लाख इतकी आहे.

आणखी वाचा- मोदी का सोडणार सोशल मीडिया? नेटकऱ्यांच्या भन्नाट रिएक्शनचा महापूर

सोशल मीडियामध्ये मोठी उत्सुकता

जर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेऊन येणार असतील तर त्यांचे फॉलोवर्स तिकडे शिफ्ट होतील का? जगभरातील जे नेते मोदींशी कनेक्टेड आहेत ते देखील नव्या प्लॉटफॉर्मवर शिफ्ट होतील का? या सर्व चर्चांना रविवारीच पूर्णविराम मिळणार आहे.