पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्या प्रकरणी मेहुल चोक्सीची चौकशी करायची असल्यास अंमलबजावणी संचालनालयाचे पथक अँटिगात जाऊ शकते किंवा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यत तीन महिने प्रतीक्षा करावी, असे मेहुल चोक्सीच्या वकिलांनी शनिवारी न्यायालयात सांगितले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरोधात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणी दरम्यान शनिवारी मेहुल चोक्सीच्या वकिलांनी बाजू मांडली. मेहुल चोक्सीच्या वकिलांनी सांगितले की, मेहुल चोक्सी याची प्रकृती सध्या चांगली नाही. तो प्रवासासाठी वैद्यकीयदृष्ट्या फिट नाही. त्यामुळे ‘ईडी’चे पथक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचा जबाब घेऊ शकतात. किंवा ‘ईडी’ची एक टीम अँटिगा येथे जाऊ शकते, असे चोक्सीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मेहुल चोक्सीच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत ईडीने तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी, त्यानंतर ते जबाब नोंदवण्यासाठी परतू शकतील, अशी माहिती वकिलांनी दिली.

दरम्यान, सहा नोव्हेंबर रोजी ‘ईडी’ने मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक केली होती. कोलकाता विमातळावरून दीपक कुलकर्णीला अटक करण्यात आलीय हाँगकाँगवरुन तो कोलकाता येथे आला होता. दीपक कुलकर्णी हाँगकाँग मध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्सीशी संबंधित आहे.