पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) ११,४०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांचे पासपोर्ट शनिवारी रद्द करण्यात आले आहेत. एएनआयने त्यांच्या सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.


परराष्ट्र मंत्रालयाने या दोघांचे पासपोर्ट यापूर्वीच निलंबित केले होते. यासाठी मंत्रालयाने या दोघांनाही नोटीस पाठवून त्यांचे पासपोर्ट रद्द का करू नये? अशी विचारणा केली होती. यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा अवधीही देण्यात आला होता. मंत्रालयाने नोटीशीत म्हटले होते की, जर याबाबत उत्तर आले नाही तर असे मानण्यात येईल की, दोघांजवळही बोलण्यासारखे काहीही नाही. त्यानंतर त्यांचा पासपोर्ट रद्द होईल. दरम्यान, हिरे व्यापाराशी संबंधीत काही लोकांनी दावा केला आहे की, त्यांनी अनेक वेळा नीरवला बेल्जिअमच्या पासपोर्टवर प्रवास करताना पाहिले आहे.

याबाबत अशाही बातम्या येत होत्या की, नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला तरी त्याला कुठलाही फरक पडणार नाही. कारण नीरवकडे इतर देशांचे पासपोर्ट आणि राहण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये घरं उपलब्ध आहेत.

अरबपती असलेल्या नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी पंजाब नॅशनल बँकेद्वारा जारी केलेल्या १५० गॅरंटी पत्रांद्वारे ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बनावट व्यवहार केले आहेत.