पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने गुरुवारी सीबीआयला उत्तर दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी सध्या प्रवास करु शकत नाही, असे मेहुल चोक्सीने म्हटले आहे. माझा पासपोर्ट रद्द का केला, याबाबत मुंबईच्या विभागीय पारपत्र कार्यालयाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. मी भारतासाठी धोकादायक कसा काय ठरु शकतो, असा सवालही त्याने विचारला आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी, त्याचा मामा आणि गीतांजली जेम्सचा अध्यक्ष मेहुल चोक्सी हा देखील आरोपी आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी दोघेही सध्या देशाबाहेर आहेत. मेहुल चोक्सीने गुरुवारी सीबीआयला उत्तर दिले. मेहुल चोक्सीने सीबीआयला पाठवलेल्या ईमेलमध्ये ११ मुद्दे आहेत. यात माध्यमांवर, राजकीय पक्षांवर आरोप करण्यात आले आहे. ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला प्रवास शक्य नाही. मला ह्रदयविकाराचा त्रास असून त्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच माझ्यावर उपचार सुरु आहेत’, असे त्याने सांगितले. अटक झाल्यास मला योग्य उपचार मिळू शकणार नाही. मला खासगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, असेही त्याने म्हटले आहे.

भारतातील विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणावरुन राजकारण सुरु केले आहे. तसेत मीडिया ट्रायलही सुरु आहे. कोर्टाने आम्हाला दोषी ठरवल्यासारखी वागणूक माध्यमांमधून दिली जात आहे, असा दावाही त्याने केला.

माझा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याने भारतात परतताना अडथळे येऊ शकतात. पासपोर्ट रद्द का केला अशी विचारणा मी मुंबईतील विभागीय पारपत्र कार्यालयाकडे केली होती. मात्र त्यांच्याकडून समाधानाकारक उत्तर मिळू शकलेले नाही, असे त्याने म्हटले आहे. माझा ज्या लोकांशी व्यावसायिक संबंध होते, त्यांच्याकडूनही मला आता धमक्या येत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी मेहुल चोक्सीच्या गीतांजली समुहाचा उपाध्यक्ष विपूल चितालीया याला अटक केली होती. तर ईडीनेही मेहुल चोक्सीच्या १२०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईमेलमध्ये त्याने या कारवाईचा देखील उल्लेख केला आहे.