तीन तलाक प्रकरणावर एका टीव्ही चॅनलवर चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम या धर्मगुरुने निदा खान या महिलेला वाळीत टाकण्याचा फतवा हा चर्चेचा विषय होता. चर्चेचा विषय अचानक टोकाला पोहोचला आणि मौलवी एजाज अरशद कासमी संतापले व त्यांनी चर्चेमध्ये सहभागी झालेल्या महिला वकिल फराह फैज यांना मारहाण केली. कार्यक्रमाच्या सुत्रधाराने आणि इतरांनी मध्यस्थीचा प्रयत्न करुनही मौलवींचा राग शांत झाला नाही. तोपर्यंत चर्चेदरम्यान मारहाणीची माहिती नोएडा पोलिसांना मिळाली आणि पोलीस झी हिंदुस्तानच्या कार्यालयात पोहोचले व मौलवीला ताब्यात घेतलं.

झी न्यूज हिंदुस्तानच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता तीन तलाक मुद्द्यावर चर्चा सुरू होती. कार्यक्रमात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मुफ्ती एजाज अरशद कासमी आणि तीन तलाकच्या मुख्य याचिकाकर्त्या फराह फैज सहभागी झाले होते. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अंबर जैदी या देखील होत्या.उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम या धर्मगुरुने निदा खान या महिलेला वाळीत टाकण्याचा फतवा हा चर्चेचा विषय होता. चर्चेदरम्यान मुफ्ती एजाज अरशद कासमी हे त्यांच्यावर केलेल्या एका टिप्पणीमुळे भडकले. प्रथम त्यांची अंबर जैदी यांच्याशी बाचाबाची झाली त्यानंतर मात्र ते फराह फैज यांच्यावर संतापले. खुर्चीवरुन दोघेही उठले आणि त्यांच्यात जोरजोरात बाचाबाची सुरू झाली, अचानक मुफ्ती भडकले आणि त्यांनी फराह फैज यांना मारहाण करायला सुरूवात केली.

मारहाण होताना पाहून चर्चेत सहभागी झालेले इतर, चॅनलचा स्टुडिओ स्टाफ मध्यस्थीसाठी पोहोचले, तोपर्यंत नोएडा पोलिसांना घटनेची माहिती चॅनलच्या कार्यालयातून देण्यात आली. पोलिसांनी कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहिली आणि कार्यक्रम संपताच त्यांनी मुफ्ती एजाज अरशद कासमी यांना ताब्यात घेतलं.

पाहा व्हिडिओ –