उत्तर प्रदेशातील इटाह येथील एका पोलीस कॉन्स्टेबलने अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीची लाठीने मारहाण करुन हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नितीन राणा याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येच्या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितीन जालीसार पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीबीएस ऑपरेटरचे काम करत होता. त्याचे एका सहकारी महिला पोलीसासोबत प्रेमसंबंध सुरु होते. त्यांच्या या नात्याला पत्नी नीतूचा विरोध होता. नितीनच आणि नीतूच्या(२८) लग्नाला सहावर्ष झाली होती. या जोडप्याला एक पाचवर्षांचा मुलगाही आहे. नितीन आणि नीतू सरकारी निवासस्थानी राहत होते.

नितीनचे इटाह पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या एका महिला पोलिसाबरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. अनेकदा माझ्या मुलीने या नात्याला विरोध केला. पण नितीन सुधरला नाही. त्याचे बाहेर प्रेम प्रकरण सुरुच होते. शनिवारी रात्री नितीन घरी आल्यानंतर त्याचे पत्नीबरोबर जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात त्याने लाठीने मारहाण करुन माझ्या मुलीची हत्या केली असा आरोप नीतूचे वडिल विरेंद्र सिंह यांनी केला आहे.

या जोडप्याच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या महिलेने सांगितले कि, नितीन आणि नीतूमध्ये अनेकदा भांडणे व्हायची पण नितीनचे बाहेर अनैतिक संबंध आहेत याची आम्हाला कल्पना नव्हती. इटाह शहराचे सर्कल ऑफिसर वरुण कुमार सिंह यांनी नितीनचे अनैतिक संबंध असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी सुद्धा अव्यवासायिक वर्तनासाठी नितीनला निलंबित करण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली. नितीन सध्या तुरुंगात आहे.