अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण
पूर्व दिल्लीत पाच वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज साह याला येथील शहर न्यायालयाने गुरुवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील सहआरोपी प्रदीप याने केलेल्या दाव्याची त्याच्यासह समोरासमोर खातरजमा करून घेण्यासाठी मनोजला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय गर्ग यांनी मनोजला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याला ३० एप्रिलपर्यंत तेथे ठेवण्यात येईल. बलात्कारानंतर मनोजचे रक्ताने माखलेले कपडे हे त्याच्या मूळ गावी बिहारमध्ये मुजफ्परनगर येथे असून ते मिळवण्यासाठी त्याला तेथे नेणे भाग आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्याचा सहकारी १९ वर्षीय प्रदीप याने दिलेली जबानी पडताळून पाहणेही गरजेचे आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला पटवून देताना मनोजला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनोज साहला गुरुवारी कडक बंदोबस्तात न्यायालयीन कोठडीतून चेहरा पूर्णत: झाकलेल्या अवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांनी एका कोऱ्या कागदावर मनोजच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले. दिल्लीतून पसार झाल्यानंतर मनोजने छापरा येथे वेगळे होण्यापूर्वी प्रदीपला एक चिट्ठी दिली होती. त्यात दोन दिवसांनी फोन कर, अशी सूचना प्रदीपला देण्यात आली होती. चिट्ठीतील हस्ताक्षराशी पडताळून पाहण्यासाठी मनोजच्या हस्ताक्षराचे नमुने गुरुवारी घेण्यात आले.
दरम्यान, न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मनोजला कडक बंदोबस्तात कोर्टरूममधून बाहेर नेत असताना मार्गिकेमध्येच अचानक मनोजने बैठक मारली. चौकशीअंती त्याला एकाएकी अस्वस्थ वाटल्याने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.