छत्तीसगडमधील कंकेर जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात एक पोलीस हुतात्मा झाला तर इतर काही जण गंभीर जखमी झाले. नक्षलवाद्यांनी भाकप (माओवादी) या संघटनेच्या पीपल्स लिबरेशन आर्मी सप्ताहात पहिलाच हल्ला केला.
आज सकाळी सीमा सुरक्षा दल व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोयलीबेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला, अशी माहिती कंकेरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह मीणा यांनी दिली.
जेव्हा सुरक्षा दलांनी उत्तर बस्तर जिल्ह्य़ात मरकानर खेडय़ात एका ठिकाणी सुरक्षा कडे केले तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरुंगाचा स्फोट केला. त्यात एक जवान ठार, तर दोनजण जखमी झाले असे मीणा यांनी सांगितले. या घटनेनंतर लगेचच कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली तसेच जखमी पोलिसांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी रायपूर येथे हलवण्यात आले. सहायक कॉन्स्टेबल बैजुराम पोटाय यांचा रायपूर येथे रुग्णालयात उपचार होत असताना मृत्यू झाला, कॉन्स्टेबल संतराम नेताम यांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील बस्तर व कंकेर भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नक्षलवादी मृत नेत्यांच्या स्मृतीसाठी ८ डिसेंबपर्यंत सप्ताह पाळत असताना त्यांनी हा पहिलाच हल्ला केला. नक्षलवादी या काळात बैठका घेऊन त्यांच्या विचारसरणीचा प्रसार करतात.